Wednesday, April 22, 2020

संघराज्य सावधान



संघराज्य पद्धतीत संघाच्या अधिकार मर्यादा आणि राज्यांची कर्तव्य-जाणीव यांचे भान सर्वानाच असावे लागते. ते तसे नसेल तर त्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी दक्ष माध्यमांची. हे त्रिवेणी संतुलन हा लोकशाहीचा गुरुत्वमध्य..
करोना-भारित टाळेबंदीबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार कोणाचा? अनेक प्रांतांत, राज्यांत विभागल्या गेलेल्या देशात स्थानिक मुद्दय़ांवर व्यवस्थापन कोणाचे? त्या देशात संघराज्य व्यवस्था असेल तर केंद्रीय संघप्रमुखाचे अधिकार कोठे संपतात आणि स्थानिक मुख्यमंत्री वा तत्समांचे कोठे सुरू होतात? सर्व देशावर केंद्रीय प्रमुखाचाच अधिकार चालणार असेल तर मग संघराज्य याचा अर्थ काय? पण संघराज्य आहे म्हणून स्थानिक प्रमुख मध्यवर्ती नेतृत्वास डावलू शकतात काय? अशा देशांत या दोघांच्या अधिकारांच्या सीमारेषा आखलेल्या असतात. पण त्यांचा आदर उभयतांकडून केला जात नसेल तर उपाय काय? त्यातही केंद्रीय नेता अधिकारांची मर्यादा ओलांडत असेल तर त्यास आवरणार कोण? मीच साऱ्या देशाचा भाग्यविधाता आणि मीच सर्व काय ते निर्णय घेणार असे मध्यवर्ती नेत्याचे म्हणणे असेल तर केंद्र-राज्य संबंधांचे काय? हे आणि असे अनेक प्रश्न अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित पत्रकार परिषदेमुळे उपस्थित होतात. पत्रकारांचे कर्तव्य आणि ते निर्भीडपणे पार पाडणारे पत्रकार यांचे विलोभनीय दर्शन त्या पत्रकार परिषदेत घडले. ज्या कोणा लोकशाहीप्रेमी नागरिकांनी हा प्रसंग पाहिला नसेल त्यांनी तो तातडीने अनुभवावा. या पत्रकार परिषदेत ट्रम्प चिडले आणि त्यांनी थयथयाट केला. पण पत्रकारांनी आपली पातळी आणि दर्जा यत्किंचितही न सोडता या ‘भावपूर्ण’ प्रसंगात आपल्या बुद्धिनिष्ठेचे दर्शन घडवले. जे काही तेथे घडले ते बऱ्याच जणांस बरेच काही शिकवून जाणारे असू शकते. म्हणून त्याची ही विस्तृत दखल.
आपल्या नैमित्तिक वार्तालपात ट्रम्प यांना देशातील टाळेबंदी उठविण्याबाबत प्रश्न विचारला गेला. अमेरिकेतील ज्या राज्यांत करोनाचा प्रसार संपूर्ण नियंत्रणात आला आहे त्या राज्यांच्या गव्हर्नरांनी (आपले मुख्यमंत्री तसे अमेरिकेत गव्हर्नर. ते राजकीय पक्षांशी निगडित असतात आणि थेट निवडून दिले जातात.) आपापल्या प्रांतातून टाळेबंदी शिस्तबद्धपणे शिथिल करण्याचे योजले आहे. त्याबाबत विचारता ट्रम्प म्हणाले : अमेरिकेत अध्यक्षाचे अधिकार सर्वंकष (टोटल) आहेत आणि ते केंद्र-राज्यात विभागण्याचा प्रश्न नाही. या त्यांच्या उत्तराने धक्का बसलेल्या वार्ताहराने या ‘संपूर्ण अधिकार’ दाव्यावर ट्रम्प यांना सातत्याने छेडले. ‘‘तुम्ही कोणत्या राज्याच्या गव्हर्नरास या संदर्भात विचारले आहे काय’’ हा प्रश्न ट्रम्प यांनी झिडकारला आणि त्याची गरज नाही, असा दावा केला. अध्यक्षाचे अधिकार अंतिम असतात, असे त्यांचे म्हणणे. या मुद्दय़ावर अधिक काही विचारू पाहणाऱ्या वार्ताहरावर ट्रम्प ‘आता बास’ असे म्हणून गुरकावले. मग त्यांनी आपल्या सरकारची या विषाणूस रोखण्याची कामगिरी किती उत्तम आहे हे सांगण्यास सुरुवात केली.
त्यावर दुसऱ्या वार्ताहराने तुम्ही नेमके काय काय केले ते सांगा असे विचारता ट्रम्प यांचा पारा चढू लागला. आपले काम ऐतिहासिक आहे, हाच त्यांचा धोशा. त्याने वार्ताहर शांत होत नाहीत हे दिसल्यावर ट्रम्प आपल्या सरकारी निर्णयांचा तारीखवार तपशील जाहीर करू लागले. त्यास तितक्याच सखोल तपशिलाच्या आधारे वार्ताहराकडून प्रतिप्रश्न येऊ लागले. यावर ट्रम्प यांच्याकडे प्रतिवाद करण्यासारखा मुद्दा खरे तर नव्हता. पण हे लक्षात आल्यावर त्यांनी आपली तोफ विरोधी पक्षीय, डेमॉक्रॅटिक पक्षाचे संभाव्य अध्यक्षीय उमेदवार जो बायडन यांच्यावर डागली. वास्तविक या वार्ताहर परिषदेतील चर्चा आणि जो बायडन यांचा काहीही संबंध नव्हता. पण बायडन यांना काही कसे कळत नाही, हे ट्रम्प सांगू लागले. त्यावर, ‘‘बायडन यांच्याशी आम्हाला या क्षणी काही घेणे देणे नाही, तुमच्या सरकारने काय केले ते सांगा,’’ असे तितक्याच तडफेने सदर पत्रकाराने ट्रम्प यांना सुनावले. तेव्हा ट्रम्प यांचा तोल सुटला आणि त्या वेळी एका महासत्तेचा प्रमुख एका तरुण वार्ताहराशी बा-चा-बा-ची करू लागला. ‘‘तुम्हाला माझे महान काम दिसत नाही, कारण तुम्ही सर्व फेक न्यूजचे भाग आहात,’’ हा त्या वादावादीच्या अखेरीस ट्रम्प यांचा निष्कर्ष. त्याआधी ट्रम्प यांनी वार्ताहरांसमोर स्वत:च्या कामगिरीची ध्वनिचित्रफीत सादर केली. पण तीच किती ‘फेक’ आहे हे सीएनएनसह सर्वानी लगोलग सोदाहरण स्पष्ट केले. जे काही झाले त्याने अमेरिकेचे विचारविश्व हादरले असून असा प्रकार देशाच्या इतिहासात कधी घडला नसल्याची भावना सार्वत्रिकपणे व्यक्त होताना दिसते.
हा धक्का दुहेरी आहे. एखाद्या हुकूमशहासारखे सर्वाधिकार स्वत:कडे असल्याचा ट्रम्प यांचा दावा आणि दुसरा धक्का म्हणजे एका निस्सीम लोकशाही उपासक देशाच्या अध्यक्षाचे पत्रकारांशी वर्तन. अमेरिकी नागरिक आपल्या स्वातंत्र्य हक्कास कमालीचा जपतो आणि माध्यमे ही आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे प्रतीक आहेत अशी त्याची ठाम श्रद्धा असते. त्यामुळे माध्यमांची गळचेपी करणारा राजकारणी अप्रत्यक्षपणे आपल्याच मुसक्या आवळत आहे असे अमेरिकी नागरिकाचे मत असते. म्हणून ट्रम्प यांच्या वर्तनाचे पडसाद संपूर्ण अमेरिकाभर उमटत असून त्यांचे वर्तन अध्यक्षाच्या सर्वोच्च पदाचा अधिक्षेप करणारे आहे, अशी भावना सर्वसामान्य तसेच राजकारणी यांचीही आहे. त्याचाच आविष्कार ट्रम्प यांच्या या प्रकारानंतर काही क्षणांत दिसला. न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर अँड्रय़ू क्युमो यांनी ट्रम्प यांना त्यांची जागा दाखवून दिली. ‘‘आपल्याकडे राजेशाही नाही.. लोकनियुक्त व्यक्ती अध्यक्ष असते आणि देशाचा कारभार काही एका घटनेनुसार चालतो,’’ इतक्या स्पष्ट शब्दांत क्युमो यांनी ट्रम्प यांची अरेरावी किती अस्थानी आणि अयोग्य आहे ते दाखवून दिले.
ट्रम्प यांच्या संतापामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे न्यूयॉर्क टाइम्सचे गेल्या काही दिवसांतील वार्ताकन. करोनाच्या प्रारंभीच्या काळात ट्रम्प प्रशासनाने त्याकडे कसे दुर्लक्ष केले, त्यांना गांभीर्य कळले कसे नाही, संपूर्ण जानेवारी-फेब्रुवारी महिने ट्रम्प यांनी या विषयात लक्षही घातले नाही इत्यादी तपशील टाइम्स इत्थंभूतपणे मांडत असून त्यामुळे ट्रम्प प्रशासन अडचणीत येऊ लागले आहे. तसेच हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधाचा ट्रम्प यांचा आग्रह किती अशास्त्रीय आहे हे अनेक वैद्यकांच्या साक्षींआधारे टाइम्सने दाखवून दिले. याच औषधासाठी ट्रम्प यांनी भारतास ‘इशारा’ दिला आणि त्यानंतर हे औषध आपण अमेरिकेस देण्याचे मान्य केले. या आणि अशा मुद्दय़ांवर अमेरिकेतील अन्य माध्यमेही आपले निसर्गदत्त कर्तव्य तितक्याच जोरकसपणे पार पाडताना दिसतात. हे, ‘मी म्हणेन ती आणि तीच पूर्व’ अशा वृत्तीच्या ट्रम्प यांना सहन होण्यापलीकडचेच. त्याचमुळे ते घसरले आणि अशोभनीय वर्तन करते झाले. त्यानंतर लगेच किमान तीन राज्यांच्या गव्हर्नरांनी ट्रम्प यांच्या संतापास कवडीचीही किंमत न देता स्वत:च्या राज्यात स्वत:चा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली.
हे सर्व त्या देशातील सबल, सक्रिय आणि सजग यंत्रणांचे सुखद दर्शन घडवणारे. संघराज्य पद्धतीत संघाच्या अधिकार-मर्यादा आणि राज्यांची कर्तव्य- जाणीव यांचे भान सर्वानाच असावे लागते. ते तसे नसेल तर त्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी दक्ष माध्यमांची. हे त्रिवेणी संतुलन हा लोकशाहीचा गुरुत्वमध्य. तो दक्षिणेकडे सरकू नये म्हणून त्या देशातील व्यवस्था किती सावधान आहेत हे पाहणे आश्वासक ठरते.

एमपीएससी: दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा – सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा म्हणजेच दुय्यम सेवा पूर्वपरीक्षेच्या सामान्य अध्ययन घटकातील विषयांच्या तयारीबाबत या आधीच्या लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये मागील तीन वर्षे सामान्य विज्ञान या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्याआधारे तयारी करताना लक्षात घ्यायचे मुद्दे याबाबत चर्चा करण्यात येत आहे.
मागील वर्षी विचारण्यात आलेले काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू. या प्रश्नांतील योग्य उत्तरांचे पर्याय ठळक के लेले आहेत.
प्रश्न १ –  दोन अणूंना आयसोबार म्हणतात जर   ————
१) प्रोटॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये समान असेल.
२) न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये समान असेल.
३) न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये समान असेल.
४) न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये असमान असेल.
प्रश्न  २. सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनण्ट लसीचे उत्पादन व वितरण करते?
१) मिसल्स लस
२) डिफ्थेरीया, टिटॅनस, परटय़ुसिस व हेपेटायटीस बीची लस
३) हेपेटायटीस बीची लस
४) रेपॉयटीन
प्रश्न ३. अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमांनुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
अ. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात.
ब. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातात.
पर्यायी उत्तरे:
१) विधाने अ आणि ब दोन्हीही सत्य आहेत.
२) विधान अ सत्य असून ब असत्य आहे.
३) विधान अ असत्य असून ब सत्य आहे.
४) विधाने अ आणि ब दोन्हीही असत्य आहेत.
प्रश्न ४. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
अ. टेनिया सोलियमला हुक जंत असेही म्हतले जाते.
ब. फॅस्सीला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते.
क. अ‍ॅसन्कालोस्टोमा डय़ुडेनलला टेप जंत असेही म्हटले जाते.
ड, नेरेस चिल्कॅनसिस हे सामान्यत: चिंधी असे म्हणतात.
पर्यायी उत्तरे
१) क फक्त      २) ब आणि ड फक्त
३) अ फक्त      ४) अ आणि क फक्त
प्रश्न ५. खालीलपैकी कोणती विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत?
अ. ध्वनी तरंग हे अवतरंग असतात.
ब. ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगांची वारंवारिता २० हर्ट्झ इतकी असते.
क. ध्वनी तरंगांच्या प्रसारण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते.
ड. अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ (Noise) म्हटले जाते.
पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब   २) अ आणि क
३) ब आणि क   ४) क आणि ड
प्रश्न ६. जेव्हा वितळलेल्या सोडीयम क्लोराइडमधून १०० अ विद्युत प्रवाह ९६५ से. करिता प्रवाहित केला तर (Na = २३; Cl’ = ३५.५)
१) २३ ग्रॅम सोडीयम अँनोडवर निक्षेप होईल आणि ३५.५ ग्रॅम क्लोरीन वायूचा कॅथोडवर निकास होईल.
२) २३ ग्रॅम सोडीयम कॅथोडवर निक्षेप होईल आणि ३५.५ ग्रॅम क्लोरीन वायूचा अँनोडवर निकास होईल.
३) २३ ग्रॅम सोडीयम कॅथोडवर निक्षेप होईल आणि १७.५ ग्रॅम क्लोरीन वायूचा अँनोडवर निकास होईल.
४) २३ ग्रॅम सोडीयम कॅथोडवर निक्षेप होईल आणि ७१ ग्रॅम क्लोरीन वायूचा अँनोडवर निकास होईल.
प्रश्न ७. डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग आहे?
१) राष्ट्रीय धनुर्वात नियंत्रण कार्यक्रम
२) राष्ट्रीय विषमज्वर नियंत्रण कार्यक्रम
३) राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
४) राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम
वरील उदाहरणांवरून एखाद्या मुद्द्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात याची कल्पना येते. तसेच अभ्यास करताना नेमके काय वाचावे, कसे वाचावे आणि नोट्समध्ये कशाचा अंतर्भाव करावा याची कल्पना येते. प्रश्नांचे विश्लेषण केल्यास महत्त्वाचे मुद्दे, कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले आहेत किंवा प्रश्न किती सोपे, किती अवघड आहेत हे लक्षात येते. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून समोर येणारे मुद्दे पुढीलप्रमाणे:
सामान्य विज्ञानाच्या एकूण १५ प्रश्नांपैकी प्रत्येकी तीन तीन प्रश्न भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांवर विचारलेले आहेत. तर जीवशास्त्र विषयावर ९ प्रश्न विचारलेले आहेत. जीवशास्त्रातील प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या अभ्यासक्रमातील घटकांवर प्रत्येकी तीन प्रश्न असे विभाजन आहे.
सर्व घटकांमधील मूलभूत संकल्पनांवर प्रश्न विचारण्याचा भर जास्त आहे. बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण कमी आहे. मात्र प्रश्नातील मुद्द्याची नेमकी माहिती असेल तर प्रश्न सोडविता येतील अशी काठिण्यपातळी असल्याने अभ्यास बारकाईने आणि समजून घेऊन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रश्नांचा दर्जा पदवीचा आहे हे लक्षात येते.
चालू घडामोडींवर फारसे प्रश्न विचारलेले दिसून येत नाहीत. मात्र दरवर्षी एखादा प्रश्न चालू घडामोडींशी संबंधित मुद्द्यावर विचारलेला दिसून येतो.
सर्व विषयांच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे आणि आवश्यक तेथे तथ्यात्मक बाबींच्या नोट्स काढणे या घटकाच्या तयारीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

एमपीएससी : दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा – भारतीय आणि शासकीय अर्थव्यवस्था

दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या अर्थव्यवस्था घटकावरील प्रश्नांचे विश्लेषण आणि त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यायच्या मुद्दय़ांबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये या घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.
अर्थव्यवस्था घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित करण्यात आला आहे :
अ) भारतीय अर्थव्यवस्था — राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़  व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी
ब) शासकीय अर्थव्यवस्था — अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी
या उपघटकांची तयारी करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते पाहू.
राष्ट्रीय उत्पन्न, परकीय व्यापार, मुद्रा, बँकिंग आणि राजकोषीय नीती :
राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी), सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीएनपी) यातील फरक समजून घेणे व त्याबाबतची अद्ययावत आकडेवारी माहीत असणे आवश्यक आहे.
भारताच्या परकीय व्यापारातील महत्त्वाचे भागीदार देश, सर्वात जास्त आयात / निर्यात होणारे देश किंवा संघटना, आयातीमधील व निर्यातीमधील सर्वाधिक मूल्य / वाटा असणाऱ्या वस्तू या बाबींचे कोष्टक तयार करून त्याचा अभ्यास करता येईल. यातील महत्त्वाच्या बाबींची मागील वर्षांच्या आकडेवारीशी तुलना करता आल्यास उत्तम.
चलनविषयक मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्या आधारे रिझव्‍‌र्ह बँक, तिचे अधिकार, कार्ये, विविध दर यांचा आढावा घ्यावा.
बँकिंगविषयक विविध व्याजदर,  बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी यांचा आढावा घ्यायला हवा.
राजकोषविषयक संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. राजकोषीय तूट, आधिक्य, त्यांचा अर्थ, कारणे, परिणाम या बाबी परीक्षेत विचारल्या जात नाहीत, पण त्या समजून घेतल्याशिवाय आत्मविश्वासाने पेपर सोडविणे सोपे होणार नाही.
शेती, उद्योग
शेती क्षेत्र याचा अर्थ प्राथमिक क्षेत्र असा घेऊन अभ्यास करायचा आहे. कृषी, पशुपालन, मत्स्यव्यवसाय या सर्व बाबींचा समावेश अभ्यासामध्ये करायला हवा.
या क्षेत्रातील वृद्धीचे ट्रेण्ड, कमी उत्पादकतेची कारणे, उत्पादनास चालना देणाऱ्या विविध योजना यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.
आर्थिक विकासामध्ये आर्थिक पाहणी अहवाल, अर्थसंकल्प, विविध आर्थिक निर्देशांक व अहवाल, पायाभूत सुविधा व इतर अर्थविषयक योजना आणि असल्यास नवे कायदे वा तरतुदी यांचा समावेश होतो. या सर्व बाबी चालू घडामोडींचाच एक भाग आहेत.
महत्त्वाचे उद्योग व त्यांच्यासाठी प्रसिद्ध शहरे / क्षेत्रे, महारत्न, नवरत्न, मिनीरत्न कंपन्या, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण धोरण, खासगी उद्योगांचे प्रकार, उद्योग क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीच्या मर्यादा यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
प्राथमिक व उद्योग क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा, आयात व निर्यातीमधील वाटा माहीत असायला हवा. दारिद्रय़ व बेरोजगारी :
दारिद्रय़ अभ्यासासाठी नेमलेल्या समित्यांच्या अहवालातील मुख्य शिफारशी माहीत असायला हव्यात.
रोजगारविषयक संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. रोजगारविषयक निर्देशांक व ठळक अद्ययावत आकडेवारी नेमकेपणाने माहीत असायला हवी.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेची दारिद्रय़विषयक अहवाल व आकडेवारी अद्ययावत करून घ्यावी.
पंचवार्षिक तसेच इतर योजनांत दारिद्य््रा निर्मूलनासाठी राबवलेले कार्यक्रम त्याची उद्दिष्टे आणि परिणाम यांचा आढावा घ्यावा.
रोजगार निर्मितीसाठीच्या तसेच स्वयंरोजगाराबाबतच्या महत्त्वाच्या योजना व त्यातील तरतुदी माहीत करून घ्याव्या.
कौशल्य विकासासाठीच्या योजना व त्यातील तरतुदी माहीत करून घ्याव्या.
अशा योजनांमधील तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, उद्दिष्टे यांचा अभ्यास आवश्यक आहे. त्यासाठी मूळ दस्तावेज पाहणे जास्त चांगले.
लोकसंख्या अभ्यास
सन २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीमधून एकूण लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, नागरी व ग्रामीण लोकसंख्या, नागरीकरण अशा घटकांचा कोष्टक पद्धतीमध्ये नोट्स काढून अभ्यास करणे सोपे व व्यवहार्य ठरेल.
वरील सर्व मुद्दय़ांचे सन २०११ व सन २००१ मधील आकडेवारी / माहितीशी तुलना करणारे कोष्टक करता आल्यास तेही उपयुक्त ठरेल.
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, धोरणाची उद्दिष्टे, दीर्घकालीन आणि अल्पकालीन ध्येय. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग — रचना, उद्दिष्टे, कार्यपद्धती हे घटक वस्तुनिष्ठ तयारीमध्ये समाविष्ट करावेत.
जन्मदर, मृत्यूदर, जननदर, जन्मावेळचे आरोग्यमान यांबाबत ठळक बाबी व आकडेवारीचा आढावा घ्यावा.
इतर तयारी
व्यापार सुलभता/ दारिद्रय़ / भूक/ लिंगभाव असमानता/ मानव विकास हे जागतिक निर्देशांक व त्यातील भारताची कामगिरी याचा आढावा घ्यायला हवा. याबाबत विशिष्ट उल्लेखनीय मुद्दे महीत असावेत.
पंचवार्षिक योजनांमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आखलेल्या धोरणांचा थोडक्यात आढावा घ्यावा व त्याचे यशापयश लक्षात घ्यावे.
शासकीय अर्थव्यवस्था
अर्थसंकल्प मुद्दय़ामध्ये याबाबतची कायदेशीर प्रक्रिया, अर्थसंकल्पातील तूट/आधिक्य व त्याचे परिणाम, यातील संकल्पना समजून घ्यायला हव्यात. त्या त्या वर्षांतील अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी, योजना यांचा अभ्यास गरजेचा आहे. महसुली उत्पन्न, करांचे प्रकार व त्यांचा एकूण महसुलातील वाटा माहीत असायला हवेत.
लेखा व लेखापरीक्षण याबाबत भारताचे नियंत्रक व लेखापरीक्षक यांचे अधिकार व कार्ये समजून घ्यावीत.